Bill Gates : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणार असून, शेती अधिक वैज्ञानिक आणि लाभदायक होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली.
राज्य शासनाच्या कृषी क्षेत्राशी संबंधित विविध योजनांना गती देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी शेतकऱ्यांसाठी एकाच ठिकाणी सर्व सेवा मिळतील असे ॲप आणि संकेतस्थळ विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती, हवामान अंदाज, कीड व्यवस्थापन आणि सरकारी योजनांची माहिती सहज मिळणार आहे.
बैठकीत पीकविमा योजना, ई-पीक पाहणी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा करण्यासाठी आणि त्यांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी केंद्र शासनाने विकसित केलेल्या साथी पोर्टलचा उपयोग करण्यावरही भर देण्यात आला.
बिल गेट्स यांनी विशेषतः हवामान अंदाज, माती परीक्षण, कीड आणि रोग व्यवस्थापन यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यास मदत करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या फाउंडेशनमार्फत राज्यातील शेतकऱ्यांना अधिक उत्पादक आणि टिकाऊ शेती करण्यासाठी तांत्रिक सहाय्य दिले जाणार आहे.
या उपक्रमांमुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल. राज्य शासन आणि खासगी क्षेत्राच्या सहकार्यातून शेतीत मोठे परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न आहे.












