Matsavyavasaya Yojana : मत्सव्यवसाय करताय? मग योजनांचा लाभ घेण्यासाठी डिजिटल नोंदणी केली का?

Matsavyavasaya Yojana

Matsavyavasaya Yojana : मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाअंतर्गत असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाने राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल मंचावर (एनएफडीपी) वर नोंदणीसाठी एक विशेष देशव्यापी मोहीम 14 ते 22 फेब्रुवारी 2025 या कालावधीत आयोजित केली आहे.

तसेच प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना (पीएमएमकेएसएसवाय) अंतर्गत प्रदान केलेल्या विविध फायद्यांचा लाभ घेण्यासाठी पात्र भागधारकांकडून अर्ज गोळा करणे आणि नोंदणी मंजुरी देण्यासाठी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

मोहिमेअंतर्गत राज्य/केंद्रशासित प्रदेशातील मत्स्यव्यवसाय विभाग, राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळ आणि सामान्य सेवा केंद्रे यांच्या सहकार्याने, नोंदणी प्रक्रिया जलद करणे, मंजुरी प्रक्रियेची गती वाढवणे आणि पात्र भागधारकांना पीएमएमकेएसएसवाय अंतर्गत पतसुविधा, मत्स्यपालन विमा आणि कामगिरी अनुदान यासारख्या असंख्य फायद्यांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने देशभरातील प्रमुख मत्स्यव्यवसाय ठिकाणे आणि क्षमता क्षेत्रांमध्ये शिबिरे आयोजित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत वर्ष 2023-2024 पासून प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह-योजना, ही 6,000 कोटी रुपये खर्चाची केंद्रीय क्षेत्र उपयोजना राबविण्यात येत आहे. मत्स्यपालन क्षेत्राचे औपचारिकीकरण करणे, संस्थात्मक वित्तपुरवठा वाढवणे, मत्स्यपालन विम्याला प्रोत्साहन देणे, मूल्यसाखळी कार्यक्षमता सुधारणे आणि मत्स्य सुरक्षा आणि गुणवत्ता हमी प्रणाली वृद्धिंगत करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

या उपयोजनेचा एक प्रमुख घटक म्हणजे मच्छीमार, मत्स्यपालक, विक्रेते, प्रक्रिया करणारे आणि सूक्ष्म उद्योगांची नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल मंच तयार करणे, ज्यामुळे औपचारिक वित्तीय प्रणाली आणि सरकारी कार्यक्रमांमध्ये त्यांचे एकत्रीकरण सुलभ होते.

राष्ट्रीय मत्स्यपालन डिजिटल मंचामध्ये नोंदणी, पतसुविधा, मत्स्यपालन सहकारी संस्थांचे बळकटीकरण, मत्स्यपालन विमा, कामगिरी अनुदान, अनुपथ आणि प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी विशिष्ट मॉड्यूल आहेत. आतापर्यंत, पोर्टलवर 17 लाखांहून अधिक नोंदणी झाल्या आहेत.

पात्र भागधारक, प्रामुख्याने मच्छीमार, मत्स्यपालक, विक्रेते, प्रक्रिया करणारे, सूक्ष्म उद्योग इत्यादी, या शिबिरांमध्ये राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल मंचावर स्वतःची नोंदणी करू शकतात जेणेकरून ते पीएमएमकेएसएसवाय अंतर्गत लाभ घेऊ शकतील.

महाराष्ट्रात मुंबईत एफएसआय आणि ससून डॉक येथे , रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे तर गोव्यात फोंडा तालुक्यातील शिरोडा गाव,तिसवाडी गावातील मलीम जेट्टी, काणकोण तालुक्यातील पालोळे , साल्सेत तालुक्यातील बाणवली पंचायत येथे ही शिबिरे होणार आहेत.

Leave a Reply