शेतकरी आपल्या शेतमालांना योग्य भाव येईपर्यंत त्याची साठवणूक वखार महामंडळा च्या गोदामामध्ये करत असतात. अशा मालाच्या तारणावर केवळ चार तासांमध्येच कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची योजना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने राबवली आहे .त्या योजनेमधून आतापर्यंत शंभर कोटी रुपयांची कर्जवाटप झाले आहे. अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर व वखार महामंडळाचे संचालक अजित रेळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या मूल्याच्या 70 टक्के कर्ज पुरवठा 9% व्याजदराने राज्य बँकेकडून केला जात आहे . या योजनेसाठी राज्य बँकेला महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, व्हर्ल कंपनी आणि जागतिक बँक अर्थसाहाय्यित बाळासाहेब ठाकरे कृषि ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट प्रकल्प) अंतर्गत विकसित केलेल्या ब्लॉकचेन संगणक प्रणालीचे सहकार्य लाभले आहे. या योजनेच्या अंतर्गत बँकेने 4543 शेतकऱ्यांना शंभर कोटी रुपयांची आतापर्यंत कर्ज वाटप केलेले आहे.
शेतकऱ्यांना हे कर्ज मिळण्यासाठी अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ही वखार महामंडळाकडून केली जाते केवायसीनुसार आवश्यक कागदपत्रांची पूर्तता ही एकदाच केली जाते . हे कागदपत्रे ब्लॉग चेन प्रणाली द्वारे ऑनलाईन पद्धतीने बँकेला मिळतात. कागदपत्रांची पाहणी होऊन संबंधित गोदाम पावतीवर ऑनलाइन पद्धतीने बँकेच्या कर्ज बोजाची नोंद होते . त्यानंतर वखार महामंडळाने निश्चित केलेल्या मूल्यांच्या 70 टक्के रक्कम शेतकऱ्यांना बँक खात्यावर आरटीजीएस अथवा एनएफटी द्वारे कर्जाची रक्कम वाटप केली जाते या सर्व प्रक्रियेस जास्तीत जास्त चार तास लागतात.