PM Kisan Yojana : लवकरच बिहार राज्याच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असून त्याची आचार संहिता लागण्यापूर्वीच विविध विकासकामांचा आणि घोषणांचा धडका सध्या तेथे सुरू आहे. यंदाची निवडणूक भाजपासाठी अवघड असून त्यांना कुठल्याही प्रकारे ती जिंकायची असल्यानेच पीएम किसानचा हप्ता तेथून पाठवला गेला अशी चर्चा आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बिहारमधील भागलपूर येथून पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता जारी केला. याप्रसंगी त्यांनी अनेक विकास प्रकल्पांचे देखील उद्घाटन केले. मोदी यांनी सर्व मान्यवरांचे आणि कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीमार्फत सहभागी झालेल्या लोकांचे स्वागत केले. महाकुंभच्या पवित्र काळात मंदारचलच्या भूमीवर पाऊल ठेवणे हे मोठे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की या भूमीमध्ये आध्यात्म, वारसा आणि विकसित भारताची क्षमता देखील आहे. ही शहीद तिलका मांझी यांची भूमी आहे तसेच रेशीम नगरी म्हणून देखील प्रसिद्ध आहे असे मोदी म्हणाले.
बाबा अजगैबीनाथांच्या पवित्र भूमीत महाशिवरात्रीसाठी जोरदार तयारी देखील सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अशा पवित्र मुहूर्तावर पीएम किसानचा 19 वा हप्ता जारी करण्याचे भाग्य मला लाभले आणि थेट लाभ हस्तांतरणाद्वारे सुमारे 22,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले.
पंतप्रधानांनी नमूद केले की बिहारमधील सुमारे 75 लाख शेतकरी कुटुंबे पीएम किसान योजनेचे लाभार्थी असून त्यांना आज 19 वा हप्ता जारी करण्यात आला. आज बिहारच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुमारे 1,600 कोटी रुपये थेट जमा झाले असे ते म्हणाले. त्यांनी बिहार आणि देशाच्या इतर भागातील सर्व शेतकरी कुटुंबांचे अभिनंदन केले. पण त्यातही बिहारच्या शेतकऱ्यांवर जास्त भर दिला. त्यातूनच आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने तेथे तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे.
बिहारसाठी घोषणांचा पाऊस:
बिहारच्या मखाणाने आता जागतिक बाजारात प्रवेश करण्याची वेळ आली आहे असे पंतप्रधानांनी जोरकसपणे सांगितले. भारतीय शहरांमध्ये आता मखाणा हा न्याहारीतील लोकप्रिय प्रकार झाला असून त्याला सुपरफूड म्हणून ओळखले जात आहे याकडे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आल्यानुसार मखाणा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मखाणा मंडळाच्या स्थापनेमुळे हे मंडळ शेतकऱ्यांना मखाणा उत्पादन, प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि विपणन यांसह अनेक पैलूंबाबत सहाय्य करेल असे ते म्हणाले.
बिहारमधील शेतकरी तसेच युवकांसाठी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या आणखी एका महत्त्वाच्या उपक्रमाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले की बिहार आता पूर्व भारतातील अन्न प्रक्रीयेसंदर्भातील प्रमुख केंद्र बनले आहे. त्यांनी बिहारमध्ये राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान आणि उद्योजकता संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली. तसेच राज्यात कृषीक्षेत्राशी संबंधित तीन नवी उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्यात येतील असे ते म्हणाले. त्यापैकी एक केंद्र भागलपूर येथे स्थापन करण्यात येणार असून हे केंद्र आंब्याच्या ‘जर्दाळू’ जातीवर अधिक लक्ष केंद्रित करेल. इतर दोन केंद्र मुंगर आणि बक्सर येथे स्थापन होणार असून ही केंद्रे टोमॅटो, कांदा आणि बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना पाठबळ पुरवतील असे त्यांनी पुढे सांगितले. शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे निर्णय घेण्यात सरकारने कोणतीही कसर शिल्लक ठेवलेली नाही यावर त्यांनी अधिक भर दिला.
देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राला बळकट करण्यासाठी उचलण्यात येत असलेल्या असंख्य पावलांचा ठळक उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आता वस्त्रांचा मुख्य निर्यातदार बनत आहे.” भागलपूरमध्ये नेहमी असे म्हटले जाते की येथील वृक्षदेखील सोने तयार करतात असे सांगून ते पुढे म्हणाले की भागलपुरी रेशीम आणि टसर सिल्क संपूर्ण भारतात सुप्रसिध्द आहेत आणि आता इतर देशांतून देखील टसर सिल्कची मागणी वाढत आहे. केंद्र सरकार कापड आणि धागे रंगवणारी युनिट्स, कापडावर छपाई करणारी युनिट्स आणि कापड प्रक्रिया युनिट्स यांच्यासह संपूर्ण रेशीम उद्योगाच्या पायाभूत सुविधा विकासावर लक्ष केंद्रित करत आहे यावर पंतप्रधानांनी अधिक भर दिला. हे उपक्रम भागलपूरमधील विणकरांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देतील आणि त्यांना त्यांची उत्पादने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात सक्षम करतील असे त्यांनी सांगितले.
बिहारमधील वाहतूक संबंधी अडचणी सोडवण्यासाठी नद्यांवर पूल बांधून सरकार राज्यापुढे असलेली एक महत्त्वाची समस्या सोडवत आहे अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. अपुऱ्या प्रमाणातील पुलांमुळे राज्यात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत ही बाब त्यांनी अधोरेखित केली. सुमारे 1,100 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्चून गंगा नदीवर चौपदरी पूल उभारणीच्या प्रकल्पाचे काम वेगवान प्रगती करत आहे यावर त्यांनी अधिक भर दिला.












