krishi salla : हवामान राहणार कोरडे; ज्वारी, गहू, मक्याची अशी घ्या काळजी..

krishi salla

krishi salla: प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयासह राज्यातील अनेक भागात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे.

रब्बी ज्वारीचे व्यवस्थापन:
रब्बी ज्वारी पिकात कणसात दाणे भरण्याच्या अवस्थेत (पेरणी नंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे. दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या रब्बी ज्वारी पिकाचे पक्षांपासून संरक्षणासाठी उपाय योजना कराव्यात.

रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

गहू पिकाचे व्यवस्थापन:
गहू पिक फुलावर असतांना (पेरणीनंतर 65 ते 70 दिवस) पाणी द्यावे व दुधाळ पीक अवस्था (पेरणी नंतर 80 ते 85 दिवस) व दाणे भरताना (पेरणीनंतर 90 ते 95 दिवस) पाणी द्यावे.

गहू पिकात खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्क किंवा प्रादूर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन 10% ईसी 10 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% ईसी 20 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

भुईमुग व्यवस्थापन:
उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी 8 फेब्रुवारी पर्यंत करता येते. उन्हाळी भुईमूग पिकात पेरणी पूर्वी पुढील प्रमाणे बीजप्रक्रिया करावी. i. थायरम 3 ग्रॅम किंवा बाविस्टीन 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियाणे. ii. प्रति 10 किलो बियाण्यास रायझोबियम व पी.एस.बी. प्रतयेकी 250 ग्राम किंवा द्रव स्वरूपात असेल तर प्रत्येकी 60 मिली.

मका पिकाचे व्यवस्थापन:
मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. वेळेवर पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *